चाणक्य नीतीनुसार, धन-पैशाबाबत 'या' 5 गोष्टी ठेवा ध्यानात

Chanakya Niti :  जर तुम्हाला आयुष्यात कधीही पैशाची चिंता करायची नसेल तर आचार्य चाणक्य यांचे हे शब्द नेहमी लक्षात ठेवा.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 3, 2024, 11:23 AM IST
चाणक्य नीतीनुसार, धन-पैशाबाबत 'या' 5 गोष्टी ठेवा ध्यानात  title=

Chanakya Niti Quotes in Marathi: प्रत्येक माणसाच्या जीवनात पैशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या इच्छा आणि गरजा पैशाने पूर्ण होतात. पैशाबाबत चाणक्य नीतीमध्ये म्हटले आहे की, पैसा हा माणसाचा खरा मित्र असतो, त्यामुळे पैशाची नेहमी बचत केली पाहिजे. जेव्हा तुमची स्वतःची माणसं तुम्हाला सोडून जातात, तेव्हा तुम्ही साठवलेले पैसे उपयोगी पडतात. आयुष्यात कधीही पैशाची चिंता करू नये असे तुम्हाला वाटत असेल तर आचार्य चाणक्य यांचे हे शब्द नेहमी लक्षात ठेवा.

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभवांच्या आधारे जे काही सांगितले आहे, त्या आजच्या तरुण पिढीने समजून घेतल्या पाहिजेत कारण त्या गोष्टी आजच्या वातावरणातही खऱ्या ठरतात. आचार्य केवळ विलक्षण बुद्धिमत्तेचेच धनी नव्हते तर ते अनेक विषयांचे जाणकार होते. आजच्या पिढीसाठी ते मॅनेजमेंट गुरूपेक्षा कमी नाहीत. आचार्य यांनी जीवनाच्या जवळपास सर्वच पैलूंवर आपले विचार मांडले आहेत.

1. चाणक्य नीतीनुसार, पैसा नेहमी विवेकाने खर्च केला पाहिजे. पैशाची उधळपट्टी तुम्हाला जास्त काळ सोबत ठेवत नाही. फालतू खर्च करण्यापेक्षा संपत्ती जमा करण्याकडे लक्ष द्यावे. जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच ते वापरावे.

2. जर तुम्हाला जीवनात अमाप पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल. ध्येय साध्य करणे हे संपत्तीचे साधन बनते. यासाठी तुम्हाला योग्य रणनीती आणि रूपरेषा तयार करावी लागेल.

3. चाणक्य नीतीनुसार, जिथे रोजगाराची साधने असतील तिथेच यशाची शक्यता असते. मनुष्याने नेहमी अशा ठिकाणी राहावे जेथे रोजगाराची साधने असतील. तुमच्या यशात अडथळा ठरणाऱ्या अशा परिस्थिती किंवा लोकांचा तुम्ही त्याग केला पाहिजे. या गोष्टी लक्षात ठेवल्यास पैशाची चिंता कधीच होणार नाही.

4. चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने नेहमी प्रामाणिकपणे पैसा कमवावा. चुकीच्या मार्गाने पैसे कमावल्यास ते जास्त काळ टिकत नाही. असे लोक एक ना एक दिवस नक्कीच अडचणीत येतात आणि चुकीच्या पद्धतीने कमावलेला पैसा पाण्यासारखा वाहून जातो. प्रामाणिकपणा आणि परिश्रमातून कमावलेला पैसा माणसाला नेहमीच उपयोगी पडतो.

5. तुमचे पैसे नेहमी तुमच्या ताब्यात असावेत. जो पैसा इतरांच्या ताब्यात राहतो तो कधीच योग्य वेळी उपयोगी पडत नाही. अशा परिस्थितीत पश्चात्ताप करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही.