Maharashtra Weather : उष्णतेच्या लाटेचा 'रेड अलर्ट'; कोकणासह राज्याच्या 'या' भागात हवामानाची विचित्र स्थिती

Maharashtra Weather News : हवामानाचे बदलते तालरंग पाहता राज्यातील विविध भागांमध्ये तापमानाच मोठ्या फरकानं चढ उतार होण्याची शक्यता असून, सर्वाधिक फटका कोणत्या भागाला बसणार? पाहा सविस्तर वृत्त   

सायली पाटील | Updated: May 1, 2024, 08:47 AM IST
Maharashtra Weather : उष्णतेच्या लाटेचा 'रेड अलर्ट'; कोकणासह राज्याच्या 'या' भागात हवामानाची विचित्र स्थिती  title=
Maharashtra Weather news Red alert issued in four states unseasonal rain will continue in some part of state

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उष्णतेचा दाह अधिक वाढत असतानाच काही भागांना मात्र अवकाळी पावसाचा मारा सोसावा लागत आहे. इथं मान्सूनची प्रतीक्षाही शिगेला पोहोचली आहे. एकंदर राज्यातील हवामानाची स्थिती सातत्यानं बदलत असून, येणारा काळ उष्मा वाढवणारा असेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 

पुढील 24 तासांसाठी राज्याच्या उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र भागामध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा असून, मराठवाडा आणि  विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मुंबईच्या हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. शहर आणि उपनगरात काही ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे.  

सध्याच्या घडीला राज्यात सूर्य आग ओकत असून, महाराष्ट्रातले बहुतांश जिल्हे 40°c च्या पलिकडे पोहोचले आहेत. सोलापूरात तापमान 44°c वर गेलं असून, ठाणे जिल्ह्यात तापमान 42 अंश सेल्सिअस वर गेलं आहे. पुण्यात तापमानाचा आकडा 41.7 अंश सेल्सिअस, मालेगावात 43 अंश तर, संभाजीनगरचा पारा चाळीस अंशाच्याही पलिकडे पोहोचला आहे. 

उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट 

आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बिहारमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. ही स्थिती पाहता देशाच्या काही राज्यांमध्ये स्थानिक शासनाच्या वतीनं आरोग्यविषयक सूचना जारी करण्यात आल्या असून, काही राज्यांनी शाळांनाही सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. 

हेसुद्धा वाचा : LPG Price Cut : सिलेंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारचा दिलासादायक निर्णय 

दरम्यान, देशाच्या अतीव उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीरच्या रामबन आणि बनिहाल भागांमध्ये पाऊस, भूस्खलनामुळं विविध ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर याचे थेट परिणाम होताना दिसत आहेत.