टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, नवजात बाळासह महिलेचा मृत्यू, मुंबईतील संतापजनक प्रकार

Breaking News In Maharashtra: भांडुपमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रसूतीगृहात चक्क टॉर्चच्या प्रकाशात महिलेची प्रसूती केली आहे.   

Updated: Apr 30, 2024, 07:23 PM IST
टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, नवजात बाळासह महिलेचा मृत्यू, मुंबईतील संतापजनक प्रकार title=
Mumbai News Pregnant Women Died Due To Power Outage During Delivery in Bhandup Hospital

Breaking News In Maharashtra: भांडुपच्या सुषमा सुराज पालिका प्रसूतीगृहामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात प्रसूतीच्या दरम्यान विद्युत प्रवाह अचानक खंडित झाल्याने डॉक्टरांवर टॉर्चच्या प्रकाशात गर्भवती महिलांची प्रसूती करण्याची वेळ आली. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. पालिकेच्या या भोंगळ कारभाराने महिलेचा व नवजात शिशुचा मृत्यू झाला आहे, असा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

रुग्णालयात एका गर्भवती महिलेचे सिझर करताना अचानक वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळं डॉक्टरांनी टॉर्च लावून महिलेची प्रसुती केली. त्यामुळं नवजात शिशुचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तर गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा देखील मृत्यू झाला आहे, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. 

ईशान्य मुंबई उपनगरातील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नवजात शिशूचा मृत्यू झाल्याची पहिलीच घटना नाही. त्यामुळे या भागात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे.  तसेच, संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी संपात व्यक्त करत रुग्णालयात गोंधळ घातला. डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी, असी मागणी करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात अशा पद्धतीने घटना घडत असतील तर ही चिंतेची बाब आहे. 

जेव्हा ही घटना घडली तेव्हा मला कळवण्यात आले. मी तातडीने येथे आले. डीन मॅडमने मला सांगितले की, बाळ काढताना लाइट होती. पिशवीचे तोंड बंद करताना टाके घालताना लाइट गेली. मात्र दुर्दैवाने ते बाळ वाचले नाही. त्या बाळाच्या आईचा देखील मृत्यू झाला, अशी प्रतिक्रिया जागृती पाटील यांनी दिली आहे. 

इशान्य मुंबई नगरातील आरोग्य व्यवस्थेवर वारंवार टीका केली जात आहे. अनेकदा हा विषय उचलून धरल्यानंतरही यावर योग्य ती कारवाई झाली आहे. वारंवार या घटना घडत आहेत. आत्तापर्यंत चार वेळा अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळं यावर ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे, अशी मागणी जागृती पाटील यांनी केली आहे. 

दरम्यान,  याच भांडुप परिसरामध्ये सावित्रीबाई प्रसूती गृहाचे शिफ्टिंग हे या सुषमा स्वराज पालिका रुग्णालयात करण्यात आले होते. सावित्रीबाई पालिका रुग्णालयात आतापर्यंत कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तसेच विविध कारणांमुळे आतापर्यंत अनेक लहान मुले तसेच गर्भवती महिला दगावल्याच्या घटना समोर आल्या होत्या. परंतु आता पुन्हा सुषमा स्वराज पालिका रुग्णालयात या घटना घडल्यामुळं आता या संपूर्ण आणि व्यवस्थापनावर  कार्यवाही करावी अशी मागणी आता केली जात आहे.

कमिटी स्थापन

भांडुप मधील पालिका रुग्णालय प्रकरणांमध्ये मुंबई महानगर मुंबई महानगरपालिकेकडून  डेट रेव्ह्यू कमिटी स्थापन करण्यात आली आहे. दोन मे रोजी कमिटीची बैठक होणार आहे. या कमिटीमध्ये पालिकेचे डॉक्टर्स आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.