क्रीझच्या आत पोहोचूनही आयुष बधोनीला झाला रनआऊट; अंपायरच्या निर्णयाने होणार नवा वाद?

IPL 2024: मुंबई विरूद्ध लखनऊच्या सामन्यातील 19 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. ज्यावेळी आयुष बधोनीने दोन रन्स घेण्याचा प्रयत्न केला. 

सुरभि जगदीश | Updated: May 1, 2024, 09:03 AM IST
क्रीझच्या आत पोहोचूनही आयुष बधोनीला झाला रनआऊट; अंपायरच्या निर्णयाने होणार नवा वाद? title=

IPL 2024: आयपीएलमध्ये मंगळवारी लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात लखनऊने मुंबईचा पराभव केला. मात्र या सामन्यात एका घटनेमुळे वादाला तोंड फुटलं आहे. आयपीएल 2024 मध्ये आणखी एक वाद निर्माण झाला असून यावेळीही थर्ड अंपायरवर प्रश्न उपस्थित केले जातायत. लखनऊ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात आयुष बधोनी क्रीजच्या आत असतानाही रन आऊट झाला. यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.

मुंबई विरूद्ध लखनऊच्या सामन्यातील 19 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. ज्यावेळी आयुष बधोनीने दोन रन्स घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यादरम्यान नमन धीरने इशान किशनला थ्रो केला. इशानला पहिल्यांदा बेल सोडण्यात अपयश आले पण त्याने दुसऱ्यांदा स्टंप उडवले. ज्यावेळी निर्णय थर्ड अंपायरकडे गेला तेव्हा रिप्लेमध्ये असं दिसून आले की, बधोनी क्रीजच्या आत पोहोचला होता. मात्र तरीही त्याला आऊट देण्यात आले. यावेळी बधोनीची बॅट हवेत असल्याचं थर्ड अंपायरचे मत होतं.

रनआऊटच्या निर्णयाने लखनऊची टीम हैराण

आयुष बधोनीला आऊट करार देताच लखनऊ सुपरजायंट्सच्या कॅम्पमधील प्रत्येक व्यक्ती हैराण होती. यावेळी कर्णधार केएल राहुलला थर्ड अंपायरच्या या निर्णयावर विश्वात बसत नसल्याचं दिसून आला. केएल उठून बाऊंड्री लाईनवर उभा राहिला. त्याचवेळी मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी बाऊंड्री लाईनवर असलेल्या चौथ्या अंपायरशी उभं राहून वाद घालण्यास सुरुवात केली. याचं कारण म्हणजे बधोनी क्रीजमध्ये पोहोचल्याचं दिसून आलं होतं.

इरफान पठानने उपस्थित केले प्रश्न

केवळ लखनऊच्या टीमनेच नव्हे तर थर्ड अंपायरच्या या निर्णयावर कॉमेंट्री करत असलेला इरफान पठाणनेही प्रश्न उपस्थित केले. अंपायरच्या या निर्णयाने पठाणंही हैराण झाला होता. इरफान पठाणनेही ट्विट करून थर्ड अंपायरचा निर्णय अत्यंत वाईट असल्याचं म्हटलंय. 

चाहत्यांकडून अंपायर ट्रोल

आयपीएल चाहत्यांनी थर्ड अंपायरलाही ट्रोल केलं. या टूर्नामेंटमधील थर्ड अंपायरच्या निर्णयावर यापूर्वीही प्रश्न उपस्थित झाले होते. विराट कोहलीला नो बॉलवर आऊट दिल्याने बराच गदारोळ माजला होता. त्यातच आता अजून एका वादग्रस्त निर्णयामुळे चाहत्यांनी अंपायरला ट्रोल केलं आहे. असं असूनही अखेरीस लखनऊ सुपर जाएट्संने हा सामना जिंकला.