IPL 2024: 'टीम गेममध्ये असल्या गोष्टी करण्याची गरज काय?', इरफान पठाण धोनीवर संतापला, 'तुम्ही उगाच...'

IPL 2024: पंजाबविरोधातील सामन्यात महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) अखेरच्या षटकांमध्ये डेरेल मिशेलला (Daryl Mitchell) एक धाव काढत स्ट्राइक देण्यास नकार दिला. यामुळे माजी भारतीय क्रिकेटर इऱफान पठाणने (Irfan Pathan) संताप व्यक्त केला आहे.   

शिवराज यादव | Updated: May 2, 2024, 01:50 PM IST
IPL 2024: 'टीम गेममध्ये असल्या गोष्टी करण्याची गरज काय?', इरफान पठाण धोनीवर संतापला, 'तुम्ही उगाच...' title=

IPL 2024: महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांना पंजाबविरोधातील सामन्यात पुन्हा एकदा त्याचा फलंदाजीचा अनुभव घेता आला. अखेरच्या ओव्हर्समध्ये मैदानात दाखल झालेल्या महेंद्रसिंग धोनीने 11 चेंडू खेळले. यामध्ये त्याने एक चौकार आणि एक षटकार ठोकला. अखेरच्या चेंडूवर मात्र 2 धावा काढण्याच्या नादात तो धावबाद झाला. धोनी थोडा वेळ जरी मैदानावर असला तरी त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण आपल्या या खेळीदरम्यान त्याने केलेल्या एका कृत्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाण यानेही यावर संताप व्यक्त केला असून टीम गेममध्ये असले प्रकार करु नयेत असं म्हटलं आहे. 

चेन्नईची धावसंख्या कमी असल्याने महेंद्रसिंग धोनीच्या शेवटच्या षटकांमध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्याच्या सोबतीला न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज डेरेल मिशेल होता. पण असं असतानाही धोनीने एक किंवा दोन धावा पळत काढण्यास नकार दिला. ही अत्यंत सहजपणे मिळणारी धाव होती. विशेष म्हणजे मिशेल धोनीपर्यंत पोहोचून परत मागे फिरुन नॉन स्ट्राइकर एंडला पोहोचला. म्हणजेच त्याने दोन धावा पळून काढल्या. पण धोनी जागेवरुन हललाच नसल्याने संघाला एकही धाव मिळाली नाही. 

धोनीच्या या कृत्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. याचं कारण मिशेलही स्फोटक फलंदाज असून धोनीने त्याला स्ट्राइक दिली असती तर त्याच्यातही अखेरच्या षटकांमध्ये मोठे फटके लगावण्याची क्षमता होती. इरफानने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना म्हटलं की, "महेंद्रसिंग धोनीचा मोठा चाहतावर्ग असल्याने तुम्ही त्याच्या षटकाराबद्दल बोलाल. लोकांचं त्याच्यावर प्रचंड प्रेम आहे. पण ज्याप्रकारे तो खेळला आहे, त्याच्याकडून जास्त अपेक्षा होत्या".

"त्याने एक धाव घेण्यास नकार देण्याची गरज नव्हती. हा टीम गेम आहे. टीम गेममध्ये अशा गोष्टी करु नका. समोरचा खेळाडूही आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आहे. जर तो गोलंदाज असता तर मी समजू शकत होतो. तुम्ही हे रवींद्र आणि मिशेल या दोघांसह केलं आहे. तुम्ही हे करण्याची गरज नाही. त्याला हे टाळता आलं असतं," असं इरफान पठाण म्हणाला आहे.

इरफान पठाणने यावेळी पंजाबचा कर्णधार सॅम करन याने ज्याप्रकारे 19 व्या ओव्हरमध्ये धोनीसमोर राहुल चहरचा वापर केला त्याचं कौतुक केलं. "सॅम करनने 19 व्या ओव्हरमध्ये चहरला गोलंदाजी देणं हा मास्टरस्ट्रोक होता. कारण समोर महेंद्रसिंग धोनी असताना त्याने दोन ओव्हरमध्ये सामन्याचं चित्र पालटलं असतं. त्याने 2 ओव्हरमध्ये 30 धावा केल्या असता. पण त्यांनी तसं होऊ दिलं नाही," असं कौतुक इरफान पठाणने केलं.

"पंजाबने अत्यंत चांगली योजना आखत गोलंदाजी केली. अर्शदीपला षटकार आणि चौकार बसला असला तरी त्यानेही चांगली गोलंदाजी केली. धोनी गेल्या काही वर्षांपासून फिरकी गोलंदाजांविरोधात धावा करण्यात असक्षम ठरत आहे. त्यामुळे तो खेळण्यासाठी खालच्या क्रमांकावर येत असेल. तो शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजी करत आहे, जेव्हा जलदगती गोलंदाज यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतात," असं इरफान म्हणाला.