'आज घरी जाऊन खूप रडणार...', मराठी अभिनेत्याचे शूटींग संपल्यानंतर विकी कौशलचे वक्तव्य, म्हणाला 'माझं सौभाग्य...'

मराठीसह हिंदी चित्रपटातही तो झळकला आहे. आता सध्या तो त्याच्या आगामी 'छावा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

नम्रता पाटील | Updated: Apr 27, 2024, 02:02 PM IST
'आज घरी जाऊन खूप रडणार...', मराठी अभिनेत्याचे शूटींग संपल्यानंतर विकी कौशलचे वक्तव्य, म्हणाला 'माझं सौभाग्य...' title=

Santosh Juvekar Vicky Kaushal Unseen Video : मराठी मालिका, चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून संतोष जुवेकरला ओळखले जाते. त्याने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ यासारख्या अनेक चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. मराठीसह हिंदी चित्रपटातही तो झळकला आहे. आता सध्या तो त्याच्या आगामी 'छावा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात अभिनेता विकी कौशल हा प्रमुख अभिनेत्याची भूमिका साकारणार आहे.  आता संतोषने विकी कौशलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

संतोष जुवेकर हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. नुकतंच संतोषने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने छावा या चित्रपटाचे शूटींग संपल्याचे सांगितले आहे. संतोष जुवेकर हा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' या चित्रपटात झळकणार आहे. यात तो अभिनेता विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. आता संतोषने त्यांच्या पडद्यामागील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात विकी कौशल हा चक्क मराठीतून संतोषचे कौतुक करत आहे. 

'छावा' चित्रपटाचे शूटींग संपले

"आज छावा या चित्रपटाचे माझे शूटींग संपलेले आहे. यावेळी मला विकी कौशल यांनी खूप आग्रह केला की तू जाताना नक्की भेटून जा. म्हणून त्यांना भेटायला आलोय", असे संतोष जुवेकर या व्हिडीओत बोलताना दिसत आहे. त्यानंतर तो विकी कौशलला भेटतो. "तुमच्यासोबत शूटींग करताना खूप मज्जा आली आणि तुम्हालाही माझ्यासोबत काम करताना मज्जा आली असेल", असे सांगतो. 

मी घरी जाऊन खूप रडणार - विकी कौशल

यानंतर विकी कौशल मराठीत त्याच्याशी संवाद साधतो. "खरं सांगू तर मला खूप मज्जा आली. मी खरं सांगू तर माझं सौभाग्य आहे की मला संतोषजींसोबत काम करायला मिळालं. त्यांचे आज शूटींग संपलंय. त्यामुळे आज मी घरी जाऊन खूप रडणार आहे. मी त्याला खूप मिस करणार आहे. पण खरंच खूप मज्जा आली", असे विकी कौशलने म्हटले. 

संतोष जुवेकर काय म्हणाला?

या व्हिडीओला संतोष जुवेकरने हटके कॅप्शनही दिले आहे. "असा घेतला आम्ही निरोप माझं शूट संपल्यावर. मस्ती कधी संपणार नाही आणि अंगातली तर कधीच जाणार नाही. खूप star आहेत हिंदीत पण खरा actor star भेटला तो हा आणि माणूस पण पक्का सोना. मसान, उरी, उधम सिंग, सॅम बहाद्दूर, संजु........ जिधर मौका मिला उधर चौका छक्का मारा हैं भाईने आणि मला माहितीये मी पाहिलंय हया पोराची मेहनत माझ्या डोळ्यांनी "छावा" सिनेमा मुळे अजून एक धमाका करणार हा पोट्टा. भावा तू माझा सर्वात आवडता अभिनेता आहेस आणि आता तू खूप आवडता माणूसही झाला आहेस. असाच रहा भावा लव्ह यू. तुमची खूप आठवण येईल. लवकरच भेटू. जय भवानी", असे संतोषने म्हटले आहे. 

दरम्यान, बहुचर्चित ‘छावा’ हा चित्रपट येत्या वर्षाअखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटात विकी कौशलसह अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहेत.