'तुम्ही फक्त जिवंत राहा, मी आलोच', वादळात गाडीवर झाड पडल्याने अडकले आई-वडील, 9 वर्षाचा 1.5 किमी धावला

अमेरिकेच्या मॅरिएटा शहरात वादळात अडकलेल्या जोडप्याचा 9 वर्षाच्या मुलाने प्रसंगावधान दाखवल्याने जीव वाचला. आई-वडिलांना वाचवण्यासाठी मुलगा तब्बल 1.6 किमीपर्यंत वादळात धावला.   

शिवराज यादव | Updated: May 9, 2024, 05:08 PM IST
'तुम्ही फक्त जिवंत राहा, मी आलोच', वादळात गाडीवर झाड पडल्याने अडकले आई-वडील, 9 वर्षाचा 1.5 किमी धावला title=

संकट हे कधीही आणि कोणत्याही क्षणी येऊ शकतं. मात्र त्यावेळी जर तुम्ही प्रसंवागधान दाखवत योग्य पाऊल उचललं तर संकटावर सहज मात करु शकता. अनेकदा संकटातच आपल्याला एखादी व्यक्ती किती धीट, शूर आहे हे समजतं. अमेरिकेतील मॅरिएटा शहरात अशीच एक घटना घडली आहे. येथील एक कुटुंब वादळात अडकलं होतं. मात्र चिमुरड्याने दाखवलेल्या शौर्यामुळे कुटुंबाचा जीव वाचला. 

वादळात अडकलेली वेन आणि लिंडी यांची कार चक्क हवेत उडाली होती. यानंतर त्यांची कार एका झाडावर जाऊन आदळली होतीच. हे झाड त्यांच्या गाडीवर येऊन पडलं होतं. यामुळे दोघेही कारमध्येच अडकले होते. पण त्यांचा 9 वर्षांचा मुलगा ब्रैनसन धडपड करत बाहेर पडला. वादळ आणि गाडीवर पडलेलं झाड पाहून तो फार घाबरला होता. पण तरीही त्याने धीटपणा दाखवला. वादळात पडेल्या विजांच्या तारा, हवा या सर्वांचा सामना करत तब्बल 1.5 किमीपर्यंत तो मदत मिळवण्यासाठी धावत सुटला. जोपर्यंत मदत मिळाली नाही, तोपर्यंत तो थांबला नाही. 

ब्रैनसनचे वडील वेन यांनी आपला मृत्यूही झाला असता असं म्हटलं आहे. जर त्याने शौर्य दाखवत मदत आणली नसती तर कदाचित आम्ही जिवंत राहिलो नसतो असं ते म्हणाले आहेत. "आम्ही जवळपास 1 किमीपर्यंत वादळ पाहू शकत होतो. पण ब्रैनसन पळत राहिला," असं त्यांनी सांगितलं आहे. वेन जखमी असून सध्या आराम करत आहेत. तर पत्नी लिंडी रुग्णालयात उपचार घेत आहे. 

ब्रैनसन याने एबीसी न्यूजशी संवाद साधताना सांगितलं आहे की, "मी फार घाबरलो होतो. मी मदत मिळवण्यासाठी धावलो तेव्हा इतकंच सांगितलं की, मरु नका, मी लगेच परत येतो"

इंस्टाग्रामवर Goodnews Movement या पेजवर ही कहाणी शेअर करण्यात आली आहे. ही स्टोरी 77 हजारांपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आली आहे. तसंच त्यावर अनेकजण कमेंट्स करत आहेत. युजर्स मुलाचं तोंडभरुन कौतुक करत आहेत. काहीजण त्याची स्तुती करताना स्वत:ला रोखू शकत नाही आहेत. 

एका युजरने लिहिलं आहे की, 'कार अपघातात आणि आई-वडिलांना गंभीर जखमी झाल्याचे पाहून तो एक वादळात एक मैल धावत गेला आणि तो फक्त 9 वर्षांचा आहे. किती धाडसी मुलगा आहे!' दुसऱ्याने लिहिले,  "काय आश्चर्यकारक मुलगा आहे! तुम्ही लोक बरे होत आहात हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि मी आरोग्य आणि शांतीसाठी प्रार्थना करतो".